शनिवार, 15 जून 2013

विसंगती : बुद्ध वचन आणि पाली त्रिपिटक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात, “त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हटल्या गेले आहेत ते स्विकारतांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे......जी गोष्ट तर्कसंगत आहे, ते बुद्धवचन होय.” (बुद्द आणि त्यांचा धम्म, खंड चवथा) विज्ञान म्हणजे तर्कसंगत विचार. गुढ ज्ञान म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे कार्यकारणभावाचा अभाव. कारणाशिवाय कार्य असंभव आहे. कारण नसेल तर कार्य घडूच शकत नाही. कार्य हे नेहमी कारणांच्या सामुहिक प्रयत्नातूनच उद्भवतात. कोणत्याही एका कारणाने कार्य घडत नाही. कार्य-कारण हे अनित्य, परिवर्तनशील वैज्ञानिक विचारधारा आहे. ईश्वर व आत्मा असल्याची का करणे तर्कसंगत नाहीत म्हणून ते अज्ञान या व्याख्येत मोडतात. 

स्वार्थी लोकांनी अज्ञानाला सोबत घेवून सामान्य लोकांची हजारो वर्षांपासून दिशाभूल, लुबाडणूक केली. त्यातून वाचायचे असेल तर विज्ञानाचा आधार घेणे फार गरजेचे आहे. विज्ञान हे केवळ प्रायोगिकच असते असे नाही तर ते प्रगतीकारक वैज्ञानिक दृष्टीकोन दर्शक हा आहे. त्यातून मानवी जीवनासाठी आशावाद उभा राहतो. विज्ञान म्हणजे कल्याणकारी आशा होय. ती निराशेपासून व्यक्तीला, समाजाला देशाला, जगाला वाचवीत असते. ती जीवनाला सुखकर बनवते व दु:खात मदतीला येते. विज्ञान हे केवळ भौतिक असते असे नव्हे तर ते मानसिक सुद्धा असते. आदरणीय महामानव बुद्ध हे जगातील सर्वात मोठे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी मनाचे शास्त्र उलगडले होते. त्यांनी मनाचे शास्त्र उलगडले होते. मन आणि त्याचे व्यापार त्यांनी ओळखून त्यापासून आपली वर्तणूक कशी करावी म्हणजे नुकसान होणार नाही, याचे पदोपदी त्यांनी आयुष्यभर प्रबोधन केले. ते तथ्यातून सत्य शोधणारे असल्यामुळे तथागत म्हणून प्रसिद्ध पावले.

बुद्धधम्माच्या नावावर कोणत्या अज्ञानाचा बौद्ध भिक्षूंनी प्रचार-प्रसार केला व त्याचे समाज जीववनावर कोणकोणते बरे-वाईट परिणाम झाले? ते तपासणे धम्म प्रचाराच्या दृष्टीने आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर महायानी भिक्षुरचित त्रिपिटकाचा फार प्रभाव होता. त्यातून त्यांची भाषणे आणि वाङमय उदयास आले. त्याचा समाजावर कसा परिणाम झाला. सध्या पंचशील या विचाराचे संशोधन करणे फार गरजेचे आहे. अलीकडे भिक्षूंच्या माध्यमातून उपासकांना “पंचशील म्हणजे धम्म” अशी शिकवण दिली जात आहे. जर उपासक पंचशिलेचे पालन करीत नसेल तर तो धम्माचे पालन करीत नाही अशी अफवा भिक्षु लोक करीत आहेत. पंचशील हे महायानी संप्रदायातील भिक्षूंची देन आहे. त्रीपिटकातील खुद्दक निकायातील “खुद्दक पिटकात” त्याचा उल्लेख आहे. आता प्रश्न हा येतो कि, बुद्धाने त्रिपिटक लिहिले का? त्रिपिटक म्हणजे भिक्षूंनी वेळोवेळी तयार केलेल्या पुस्तकांचे तीन पेठारे होत. ह्या तील सर्वच विचार प्रामाणिक आणि बुद्धिवादी दृष्टीनेच लिहिले आहेत ते कशावरून समजावे?

पंचशील ज्या निकायात आले आहे ते निकाय पाचवे आहे. प्रथम चार निकाय जुने मानले जातात आणि हे पाचवे निकाय नंतरचे आहे. महायान म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हिंदुधर्माची झेरॉक्स आहे. त्यातून निघालेले तंत्रज्ञान, मन्त्रयान हे काय बुद्धधम्म सांगतात? बुद्ध म्हणतात, “जो धम्म दर्शन करतो तो माझे दर्शन करतो.” (बुद्ध आणि त्यांचा धम्म, पृष्ठ- ३३६, सम्यक प्रकाशन, नागपूर) तेव्हा त्रिशरण कशाला हवे? बुद्धा प्रमाणेच भिक्षुंना मान हवा म्हणून त्यांनी याला महत्व दिले पण धम्म न समजावता अभिवादन आणि मान कशाला हवा? पाचव्या निकायात धम्म तत्वज्ञान नसून महायानी (हिंदू) भिक्षूंची हुकुमशाही नियम आहेत. धम्माचे “आर्य अष्टांगिक मार्ग” हे प्रायोगिक तत्वज्ञान आहे, नियम नाहीत. 

पंचशील हे तत्वज्ञान नाही तर नियम आहेत. हे नियम एवढे ताठर आहेत कि ते सर्व परिस्थितीत पाळले जाऊ शकत नाही, म्हणूनच जर्मनीच्या ‘बुद्धजन उपासक समिती’ने पंचशिलापैकी पहिले शील सोडून उर्वरित “चारच शील” पाळण्यात त्यांनी तयारी दाखविली होती. जे नियम लोकांकडून सहज पाळले जाणार नसतील ते नियम बुद्धाची शिकवण कशी असू शकते? जे विचार बुद्धाने आपल्या पहिल्या धम्मचक्रप्रवर्तन प्रवचनात दिले त्याचे संक्षिप्त रूप म्हणजे पंचशील का? महायानच्या कठोर नियमांमुळे बुद्धधम्म आचरणात आणण्यास कठीण झाला. जो धम्म बोलल्या जातो पण आचरणात आणल्या जाऊ शकत नाही, असा कठोर विचार बुद्धाने लोकांना दिला होता का?

पंचशिलाचे पाच नियम म्हणजे १. प्राणीहत्या करणार नाही. २. चोरी करणार नाही. ३. खोटे बोलणार नाही, ४. कामवासनेच्या ईच्छे पासून दूर राहीन, ५. मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहीन. (बुद्धाने एका राजाच्या कथेतून संपत्ती नाशाचे कारणे सांगितली ती म्हणजे रंडीबाजी, दारू, जुगार, कुसंगती तथा यज्ञ) बुद्धाच्या धम्मात संपत्तीला क्षुल्लक महत्व आहे तर बुद्धीला अफाट महत्व आहे. क्षुल्लक संपत्ती रक्षणासाठी बुद्धाने पंचशीलेला धम्म बनवले असेल का? बुद्ध धम्माचे विचार केवळ संपत्ती रक्षण करणारे टोकाचे विचार सांगण्यासाठी आहे कि, सर्वांगीण सुखाचा सम्यक मार्ग दाखवण्यासाठी आहेत? पंचशील व्यवहारिक आहेत का? प्राणीहत्या, चोरी, कामवासना, खोटे बोलणे व न नशेली पदार्थांशी मनापासून वैर करीन, अशी प्रतिज्ञा करण्याची गरज आहे का? 

देवाच्या सामने अशा प्रतिज्ञा केल्या जातात. देव त्या ऐकतो व आपणास माफ करतो. मात्र ज्या धम्मात देवच नाही किंवा जो लोक ईश्वर मानत नाही त्यांनी ह्या प्रतिज्ञा का म्हणायच्या? पंचशील म्हणणारे लोक खरोखर पाच शीलाचे, नियमांचे पालन करीत आहेत का? या देशासाठी एक व दुसऱ्या देशासाठी दुसरा असे पंचशील बुद्धाला द्यायचे होते का? अदृश्य, सुक्ष्मप्राण्यांची व्यक्ती प्रेम करतो का? दही भात खाताना दहीतील सूक्ष्म प्राण्यांना पोटात मारले जाते, जमिनीवरून असंख्य सूक्ष्मजीव पायाखाली येतात आणि मरतात. हिंसा ही फक्त प्राण्यांचीच होते असे नाही तर वनस्पतींचीही हिंसा होते. व्यक्ती सर्वच दृश्य अदृश्य प्राण्यांशी मैत्री करू शकते का? जर तो मैत्री करू शकत नसेल तर त्यांनी खोटी प्रतिज्ञा का घ्यावी?

चोरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा घेणारे लोक स्वतःच्या फायद्यासाठी व्यवसायातील नियम अधिक नफ्याचे वापरून ग्राहकांची फसवणूक करतात कि नाही? दुकानदाराला कमी दरात वस्तू विकत मागतांना दुकानदार म्हणतो ‘मला अधिक नफा नाही, थोडासाच आहे’ पण ती वस्तू केवढ्यात विकत आणली? त्याचा तो निश्चित आकडा सांगताना दुकानदार खरेच बोलतो का? खोटे बोलून ग्राहकांच्या खिशातील पैशाची चोरी व्यक्ती करतो कि नाही? बुद्धाच्या काळी व्यापार होत नव्हता का? व्यापारातून चोर वाटेने नफा कसा केला जातो? हे बुद्धाला माहित नव्हते का? मी चोरी करणार नाही म्हणजे सत्य सांगून नफा कमावेन, अशी प्रतिज्ञा करणारा वैश्य बौद्ध नव्हता का? मी काम वासनेतील खोटे आचार करणार नाही. यातील वासना ही बुद्ध धम्मात काया, वाचा आणि मनाची असते. बौद्ध लोक किती प्रमाणात कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त आहेत? हा एक संशोधनाचा विषय आहे. 

खोटे बोलणार नाही, याचा अर्थ खरेच बोलणार व्यापारी ग्राहकां सोबत खरेच बोलतो का? विदेशी चोरांना खरे बोलून रस्ता सांगायचा का? आपल्या आईने आपणास कसे निर्माण केले? ह्याचे आई-वडील मुलाला खरेच उत्तर देतात का? मी नशा करणार नाही, या नियमाचा विचार केला तर अति भोजन केल्यानेही नशा येतो तर भोजन घेवू नये का? आप्रेशन करण्याआधी डॉक्टर रोग्याला नशेचे इंजेक्शन, लस देतात, ती घेणे म्हणजे नशा करणे झालेच कि नाही? पंचशील हे आचरणाचे अव्यवहारिक नियम आहेत. जगातील कोणताही व्यक्तीकडून त्याचे पालन करणे असंभव आहे, हे सामान्य ज्ञान बुद्धाला कळत नव्हते, असे म्हणायचे का? जे नियम गृहस्थ पाळू शकत नाही हे लक्षात असतानाही त्याचे पालन करण्याकरिता बुद्धाने धम्मदीक्षा, संघदीक्षा दिल्या होत्या का? बुद्धाच्या काळी पंचशील म्हणजे पाच सुविचार होते. बुद्धाच्या आधीपासूनच ते प्रचलित होते. त्याला बुद्धाचा शोध म्हणायचे का? 

बुद्धा आधीच जैन मुनींनी त्याचा “पाच बल” (अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य) म्हणून प्रचार केला. ती बुद्धाची शिकवण कशी? बुद्धाने दिलेल्या आर्य अष्टांगिक मार्गा पेक्षा पंचशिलेचा मार्ग महान आहे का? कसा विचार करावा? कसा निर्धार करावा? कसे बोलावे? कसे करावे? कसे आचरण करावे? कशी सवय लावावी? कसे लक्षात ठेवावे? व कशाप्रकारे मन लावून कार्य करावे? याबाबद जे विचार सम्यक म्हणजे मध्यम, उचित, प्रसंगानुसार परिवर्तन करण्याचे स्वातंत्र्य देणारे मानायचे कि, “असे करू नका व असेच करा” ही टोके सांगणारा पंचशीलेचा मार्ग मोठा समजायचा? पंचशीलेतील नियम महायानी, हिंदू विचारांच्या भिक्षूंनी बुद्ध धम्मातील चांगले विचार लपवून ठेवण्यासाठी, चांगल्या विचाराला सह, बगल देण्यासाठी, तार्किक विचाराऐवजी तर्क विसंगत विचारांचा प्रसार करून लोकांना मूळ धम्म विचारांपासून दूर नेण्यासाठी धम्मात घातल्या गेलीत. बुद्धाने सारनाथ येथे प्रथम धम्मचक्रप्रवर्तन प्रवचन समयी सुद्धा “आर्य अष्टांगिक मार्गा”लाच सुखाचा मार्ग म्हटले आणि शेवटीस मृत्युपूर्वी कुशिनारा येथे सुभद्र भिक्षुस “आर्य अष्टांगिक मार्ग”लाच कल्याण मार्ग म्हणजे धम्म म्हटले आहे. 

ज्या वेळी बुद्ध हे धम्मप्रचार करीत होते तेव्हा सुद्धा त्यांनी उपासकांना "पंचशील" पालन करण्यावर जोर दिला होता का? पंचशील म्हणजे जैनांची पाच बले आहेत. हिंदू धर्माच्या यज्ञ संस्कृतीला पर्याय म्हणून त्यांची उत्पत्ती झाली. “अहिंसा परमो धर्म” हा विचार धम्म शिकवण आहे का? “पाणातिपाता वेरमणी सिख्खापदं समादियामी” म्हणजे प्राणी मात्राच्या हत्येपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा करतो, हा विचार यज्ञातील हिंसेचा प्रतिरोधक आहे. यज्ञात प्राण्यांची हिंसा केली जात होती, पशु हे जनतेचे धन समजले जात होते. संपत्तीची हानी करण्यापासून वाचविण्यासाठी पंचशिलावर बुद्धाचे प्रवचन आहे. या नियमांचे कठोर पालन करण्यासाठी “विनय पिटका”त त्यांचा उल्लेख आहे. भिक्षु हे संन्यासी असल्याने त्याचे पालन करू ही शकतील पण, भिक्षूंनी आपले नियम जेव्हा गृहस्थावर लादले तेव्हापासून धम्मप्रचार खुंटला व अधम्म हिंदू महायानी प्रचार अर्थात (धर्म प्रचार) सुरु झाला. नियम म्हणजे धम्म सूत्र (तत्व) नाहीत.

विनय पिटक म्हणजे धम्म नाही, ते भिक्षूंचे नियम आहेत. जे नियम बुद्धाने भिक्षुंना शिकवले, पालन करण्यास सांगितले तेच नियम भिक्षूंनी गृहस्थांवर थोपवले. हा प्रकार राजा सम्राट अशोकाच्या आधीपासून झालेला आहे. म्हणून अशोकांनी पंचशिलेला जगात प्रचारित केले. संपूर्ण जगात असा प्रचार झाला आहे कि पंचशील ही बुद्धधम्माची शिकवण आहे. पंडित जवाहरलाल नेहरू पासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यातून सुटू शकले नाहीत. भिक्षूंनी जे लिहिले ते स्वयं खरे, हा गैरसमज आहे. संतानी जे लिहिले व बोलले त्या सर्वाला कल्याणकारी विचार म्हटलेच पाहिजे, असा आग्रह धरणे चुकीचे आहे. अनेक संत व भिक्षु वैज्ञानिक दृष्टीकोन जाणत नाही, त्यामुळे ते संशोधक होऊ शकले नाहीत. वैज्ञानिक विचारांवर आधारित भिक्षूंचे साहित्य आहे कि नाही हे तपासणे गरजेचे आहे. धम्म म्हणजे विनय नियम वा पंचशील कसे?

नागपूरची धम्मक्रांति आणि आर्थिक चळवळ

हामानव बुद्धाने संवादातून धम्म समजावला. धम्मप्रचारासाठी संवाद आवश्यक आहे. समजावण्याची दुहेरी पद्धत उचित आहे. भाषण आणि प्रवचन या आधारे धम्म विचार थोपले जातात. समजल्याची खात्री झाल्यावर लोक ते चांगले आहे, ठीक आहे, समजले, फार सुंदर अशी टिप्पणी करून जायचे. आता भिक्षु प्रवचन देतात. ते अनेकांना समजत नाही. न समजल्याची तक्रार करण्यासाठी भिक्षु जागाच ठेवत नाही. भिक्षूला गुरु समजावे. त्यांनी काही न समजणारे विचार सांगितले तरी ते शिष्याने मुकाट्याने पाळावे, हा कसला धम्म प्रचार? यातूनच भिक्षु-भिक्षूंनी “सत्यनारायण कथा” अर्थात “परित्राणसूत्र पाठा”च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या धर्मांतराला, धम्मदीक्षेला कात्री लावत आहेत. बाबासाहेबांनी बुद्धधम्माचे बीज पेरण्यासाठी आजन्म शेती तयार केली. त्यात आता महायानी भिक्षु हिंदू धर्माचे पिक घेत आहेत. आज शेतीचे त्या शेतीचे रखवाल कोणी आहे का? आधुनिक विज्ञानावर आधारित धम्म वा धम्माला वैज्ञानिक आधारावर प्रचारित करण्याचा प्रयत्न किती भिक्षु करतात? अंगाववर चिवर पांघरून विश्वाची पुनर्रचना करण्याचा आव आणणे भिक्षूंनी सोडायला हवे, नाहीतर तसे करून तरी दाखवायला हवे.

समाजाने व्यक्तीला शरण जायचे कि विचारांना? व्यक्ती म्हणजे उद्दिष्ट नाही. व्यक्तींचे हित हे उद्दिष्ट आहे. व्यक्तींचा समाज होतो, समाज कल्याण कि व्यक्ती कल्याण? समाज कल्याण म्हणजे जाती कल्याण असा अर्थ घेवू नये. समाज जातीतीत आहे. अनेक समाजांचा देश व अनेक देशांचे विश्व मानले तर विश्वाची पुनर्रचना करण्याचे मोठे उद्दिष्ट गाठले जाईल. व्यक्ती कल्याणातून हजारो वर्षापासून जगात भिक्षु आहेत आणि आतंकवादी, नक्षलवादी, भ्रष्टाचारी जगातील मानवी सुखाचा अंत करू पाहत आहेत. यात भिक्षुंचा प्रभाव मोठा आहे कि गृहस्थांचा? बहुजन म्हणजे समाज भिक्षूंनी समाजाला योग्य, उचित, समुचित, श्रेष्ठ, आदर्श, सम्यक, ‘बहुजन-हिताय, बहुजन-सुखाय’ संदेश दिला असता तर धम्मराज्य निर्माण झाले नसते का? भिक्षु हे जर गांधीसारखे टाटा-बिर्लांच्या ताटाखालचे मांजर बनले असतील तर काय फायदा?

बुद्ध कि कार्ल मार्क्स? यावर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला धम्म हि अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहित आहे कि कार्ल मार्क्स च्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्यांचा मताप्रमाणे “धर्म” म्हणजे काहीच नाही ज्यांना धर्माचे महत्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले, पोटभर जेवण मिळाले. निवांत झोप मिळाली कि सगळ संपल. हे त्यांच तत्वज्ञान! मी त्या मताचा नाही, माझे वडील गरीब होते; म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळाले नाही. माझ्या इतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही म्हणून माणसाचे जीवन सुख-समाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते, याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. त्या चळवळी विरुद्ध मी नाही. 

“आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजेच. पण मी यात एक महत्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोजू वैरण लागते. मानसासही अन्न लागते. मात्र दोहोत फरक हा आहे कि रेडा व बैल यांना मन नाही. मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही, असे म्हणतात, त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्यात मला काहीच कारण नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरव्ही मानव जातींचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही..... बुद्धाने सांगितले, जगात ९०% व्यक्ती दुःखाने पिडलेली आहेत. त्या दुःखातून पिडलेल्या गरीब माणसाना मुक्त करणे हे बौद्धधम्माचे मुख्य कार्य आहे. बुद्धापेक्षा वेगळे असे कार्ल मार्क्स यांनी वेगळे असे काय सांगितले?” (नागपूरच्या दीक्षाभूमीवरील भाषण, दिनांक- १५ आक्टोंबर १९५६)

धर्मांतराच्या चळवळीतून नागपूरला धम्मदीक्षा नागपूरला घडली. यात ५ लाख गरीब, उपाशी उद्या पोटभर मिळेलच या आशेने लोकांनी बाबासाहेबांकडून दीक्षा घेतली. बाबासाहेबांनी ते भुकेले राहू नये म्हणून जे प्रयत्न केले त्यातून फक्त १० % लोकांची पोटे भरली. उर्वरित ९०% लोक उपासीच आहेत. त्यांच्या पोटाला अन्न नसेल तर त्यांना बुद्धीची हालचाल कळेल का? बुद्धाने म्हटले, प्रथम उपाशी लोकांना ज्ञान नाही तर अन्न द्यावे. त्याला नंतर धम्म सांगावा. आता आपण कितीही भुकेल्या भारताला धम्म दिला तरी समजेल का? याचा सुज्ञ बौद्धांनी विचार करून धम्म प्रचाराला लागावे. तरच धम्माचा योग्य तो प्रभाव लोकांवर पडेल. बाबासाहेबांना अभिप्रेत आर्थिक लोकशाहीला किती काळ थोपवून धम्म प्रचाराचा गाढा समोर ओढता येईल? हा महत्वाचा प्रश्न आहे. 

भुकेले लोग बौद्ध धम्म सोडून दुसरीकडे का भटकत आहेत? पोटासाठी कि उपशीपोठी धम्म न समजल्यामुळे? समाजाचे सर्व प्रश्न विचारात धम्म घेत होता पण आता त्याला फक्त संस्कृतीत बहिष्कृत करून कसे चालेल? धम्माला अर्थ, शिक्षण, सत्ता, आणि संस्कृती हे चारही प्रश्न सोडवत चालावे लागेल तरच सर्वांगीण समाज परिवर्तनाची गरज पूर्ण होईल. आज फक्त भरलेल्या ढेरपोट्या लोकांसाठीच धम्म ठरत आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे. आजचे आंबेडकरी बौद्ध धम्माला फक्त पोट भरलेल्या, चैन करणाऱ्या लोकांसाठी मर्यादित करीत आहेत आणि उपाशी लोकांकडून धम्म आचरणाची अपेक्षा करतात, हे कसे शक्य आहे? आधी धर्मांतर कि आर्थिक समस्या? त्यापैकी धर्मांतर झाले पण आर्थिक समस्या सुटली नाही. जातिगत आरक्षणाने सुटणारच अशी कोणीही शाश्वती पण देवू शकणार नाही. त्यामुळे धम्म घातकी उलट जातिवाद वाढेल.

घटना : ईश्वरीय कृति कि कार्यकारण सिद्धांत?


बौद्ध, धम्मधारी लोक नेहमीच, सततच गरिबीत राहिले तर ते केव्हाही मार्क्सच्या साम्यवादाचे सैनिक बनून, बुद्ध धम्माला “अफू” समजून संपुष्टात आणतील. तसे प्रयत्न नक्षलवादी लोकांकडून चालू आहेत. 'नक्षलवाद' भारतात का आला? तर त्याची कारणे धम्म समजावून सांगण्यास बौद्ध लोक मागे पडलेत, हि आहेत. ‘’चैन” आणि “गरिबी” बुद्धाला व बाबासाहेबांना नको होती पण बौद्ध त्याला बळी पडले. बौद्धांच्या आचरणातूनच धम्म दिसायला पाहिजे पण तो दिसतो का? जर हजारो वर्षापासून चालत आलेली भिक्षूंच्या “महायानी” हिंदू, अवैज्ञानिक विचानाची भेसळ नष्ट झाली नाही तर नक्षलवादी लोकांना कोणता शुद्ध धम्म विचार द्यायला हवा? बाबासाहेब सामान्य लोकांना नियम आणि असामान्य लोकांना तत्वज्ञान सांगू ईच्छित होते. म्हणून त्यांनी विहारासोबत वाचनालय असावे असा विचार मांडला पण किती विहारात तो वास्तवात उतरला? विहारे बनलीत पण त्यात वाचनालये नाहीत पुजापाठेचा धम्म नव्हे तर धर्म फोफावला.


बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या बाजू ने उभे दिसतात. त्यांच्या मते बुद्धाचा धम्म मार्क्सच्या हमल्या पासून दूर आहे. मार्क्सच्या हमला वैश्य रुपी व्यापाऱ्यांवर आणि ब्राम्हणी पुरोहीतशाहीच्या धर्मावर आहे. व्यापारातील साधने ही सार्वजनिक असावित पण भारतात तसे नाही आणि धर्म हा अवैज्ञानिक विचारांवर आधारित आहे. बुद्धाचा धम्म हा धर्म नाही कारण त्यात आत्मा, ईश्वर, यांना स्थान नाही. तरी पुनर्जन्म आणि बौद्ध पुजापाठ यांचे समर्थन बाबासाहेबांनी केले कि नाही? विज्ञान म्हणतो कि वस्तू बदलतात पण जन्म घेत नाहीत व मृत्यूही पावत नाही पण "पुनर्जन्म" म्हणजे, पुन्हा-पुन्हा जन्म घेणे वा होणे. पेटत्या ज्योतीचा आधार घेवून दुसरी ज्योत पेटविणे, आंब्याच्या कोई पासून झाड बनणे, आई-वडिलांपासून पुत्र होणे म्हणजे पहिल्याचा दुसरा पुनर्जन्म होय, अशी मानण्याची प्रथा आहे. पण पहिला हा दुसऱ्या सारखा (जसाचा तसा) कधीच राहिला नाही. एवढेच कशाला मुळ पहिला सुद्धा क्षणोक्षणी बदलत राहिला आहे. तेव्हा कोणत्या बदलाचे दुसरे हे नवीन रूप म्हणजे पुनर्जन्म मानायचे? भौतिक पदार्थाचे अर्थात चार महाभूतांचे रूप, बदलत असते. त्याला पुनर्जन्म या संज्ञेत बांधता येईल का? 

व्यक्ती जिवंत असतांना काल सारखाच आज नाही, आज सारखाच उद्या राहणार नाही. अर्थात कालचा आज नाही व आजचा उद्या नसणार तर तो मेल्यावर, त्याला गाडल्यावर वा जाळल्यावर तो पूर्वीच्या जिवंत व्यक्तींचा वा त्याच अवशेषांचा दुसरा जन्म कसा मानता येईल? पुनर्जन्म ही संकल्पना भारतात बुद्धाच्या आधीपासून हिंदू धर्मात ब्राम्हणांनी पोसली. शरीर मरते पण आत्मा मरत नाही. महायानी काय म्हणतात? चार महाभूत मरत नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू हे मरत नाही तरी त्यांचा पुनर्जन्म होतो. पूर्वीच्याच जीवाचा वा चार महाभूतांचाच दुसरा जीव, जन्म होतो का? 

आत्म्याचा पुनर्जन्म होत नाही पण भौतिक पदार्थांचा होतो ही दोन्ही मते अवैज्ञानिक, अज्ञानी नाहीत का? पहिल्याच्या लयानंतर होतो जन्म म्हणजे निर्मिती, यातील लय व उदय हे अवैज्ञानिक असत्य आहे. वे त्यांच्या अनित्य विचारला हे, विचार विज्ञानाला आणि बुद्धाला मान्य नाही. बुद्धाने “अनित्य” मानले, कार्यकारण परंपरा मानली. चार महाभूतांचा पुनर्जन्म होतो हे विचार अवैज्ञानिक असून ते महायानी भिक्षूंचे आहेत, ते बुद्धाचे नाहीत. बौद्धांना भ्रमित करण्यासाठी महायानी हिंदुनी ते धम्मविचार म्हणून घुसडले. त्यांना कवटाळून कोणाचाही फायदा नाही. पण त्याचा फार मोठा बाहु करून मृत भौतिक मानवी अवशेषांवर “चैत्य” उभारण्याला त्यांनी धम्म समजले. बुद्धाच्या दातावर, केसावर, नखावर, अस्थीवर विहारे उभारण्याची व त्यांची पूजा करण्याची रीत पुढे आली. भौतिक अवशेषांची पूजापाठ करणे म्हणजे बुद्धाचा “मध्यम मार्ग” आहे का? ह्या स्तुप, चैत्य पूजेच्या महाअंध:श्रद्धेतून जगाची पुनर्रचना लोकशाहीच्या नैतिक मुल्यांवर करता येईल का? हा मोठा प्रश्न आहे.

बुद्धाने “कार्यकारण सिद्धांत” सांगितला त्याला “प्रतीत्यसमुत्पाद” हे शीर्षक भिक्षूंनी दिले, बुद्धाने नाही. ह्या कारणाने ते होते. ते असल्याने हे होते, हे नसेल तर ते होत नाही, हे बुद्धाचे मत होते. जुन्याचे नवीन रूप आहे, असे बुद्धाने सांगितले नाही. बुद्ध धम्मानुसार कोणतीच वस्तू जन्म घेत नाही व मृत, नष्ट होत नाही. सर्व वस्तू “अनित्य” आहेत. सर्व वस्तू परिवर्तनशील आहेत. परिवर्तनातून नवीन वस्तूला जन्म, निर्मिती म्हणणे हे भिक्षूंनी ठरविले. बुद्धाने त्यालाही अनित्य मानले. स्थिर वस्तूला नावात बांधता येते पण अस्थिर गतीशिलतेला जन्म, पुनर्जन्म या नावात बांधता येत नाही. म्हणून बुद्धाच्या “ह्या मुळे हे होते” या विचारला उत्पत्ती व लय (विनाश) च्या विचारातून सिद्ध करता येत नाही.

“कार्य-कारण सिद्धांता”ला प्रदुषित करण्यासाठी महायानी भिक्षूंनी त्याला प्रतीत्यसमुत्पाद हे नाव दिले. प्रतीत्य म्हणजे प्रत्येय, कारण, हेतू. सम्मु म्हणजे समूह. प्रतीत्य सम्मु म्हणजे प्रत्येय, हेतू, कारणांचा समूह. तर त्पाद म्हणजे उत्पाद, निर्मिती, जन्म. कारणांच्या सामुहिक प्रयत्नातून कार्य यातून बुद्धाला नवीन निर्मिती वा उदय हा अर्थ अभिप्रेत नव्हता तर अनित्य, परिवर्तनीय घटना, कार्य असे अभिप्रेत होते. पूर्वीचा जन्म आज नाही, आजचा जन्म उद्या नाही म्हणजे “सर्व अनित्य”, अस्थिर, बदलत, परिवर्तीत होत आहे. महायानी भिक्षूंनी बुद्धाच्या विचारणातून नव्हे तर हिंदू मानसिकतेतून “महायानी” भिक्षूंनी “पुनर्जन्म” मानला.